
गोंदिया : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘कफ सिरप’ (खोकल्याचे औषध) च्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी ‘कोल्ड्रिफ सिरप’ (Coldrif Syrup) नावाच्या औषधाचा वापर तात्काळ थांबवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मे. सेसन फार्मा (Sresan Pharma), तामिळनाडू या कंपनीने उत्पादित केलेल्या कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13, निर्मिती मे २०२५) मध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol – DEG) हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषारी घटक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. जर कोणाकडे हे Coldrif Syrup (बॅच क्रमांक SR-13) उपलब्ध असेल, तर त्याचा वापर त्वरित थांबवावा. हे औषध जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला तात्काळ कळवावे. असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
एफडीए, महाराष्ट्र राज्य या औषधाचा महाराष्ट्रातील वितरण साठा शोधण्यासाठी तामिळनाडूच्या औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधत आहे. राज्यातील सर्व औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत की, सदर औषधाचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तात्काळ गोठवावा.
गोंदिया जिल्ह्यातही असा साठा सापडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जनतेने सावधानता बाळगावी आणि हा धोका टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी संपर्क साधा: टोल फ्री क्रमांक: १८००२२२३६५, ई-मेल: jchq.fda-mah@nic.in, मोबाईल: ९८९२८३२२८९.



