गडचिरोलीविदर्भ

शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट! ; नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये – सभापती लीलाधर भरडकर यांचे आवाहन

गोसेखुर्द प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे ; तात्पुरता बंधारा बांधण्यासाठी पोकलन व जेसीबीद्वारे युद्धपातळीवर काम सुरू

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्यामुळे संपूर्ण शहरात मागील दोन-तीन दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना दैनंदिन वापरासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहरात पाहावे तिथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, शहराला तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पोकलन व जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने नदीपात्रात तात्पुरता बंधारा बांधण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता शहरातील नागरिकांनी ३० जून २०२६ पर्यंत पाण्याचा अपव्यय करू नये, असे कळकळीचे आवाहन नगर परिषदेचे पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती लीलाधर सुधाकर भरडकर यांनी केले आहे.

मागील काही दिवसांत उन्हाचा पारा वाढल्याने वैनगंगा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर कोरडे पडले आहे. शहराच्या मुख्य जलवाहिन्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पाणी आटल्याची भीषण समस्या उभी ठाकली आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून नगर परिषद प्रशासनाकडून वैनगंगा नदी पात्रात पोकलन आणि जेसीबी मशीन उतरवून रेती-मातीचे तात्पुरते बंधारे बांधण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. हे पाणी अडवल्यामुळे पुढील ७ ते ८ दिवसांत शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शहरातील पाणीटंचाईचे संकट कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नगर परिषदेने वरिष्ठ स्तरावर धाव घेतली आहे. वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे, यासाठी गडचिरोलीचे माननीय सहपालकमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी यांना नगर परिषदेच्या वतीने लेखी पत्र देऊन गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी सोडण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. या पाठपुराव्याला यश येऊन पुढील आठवड्याभरात गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.

जोपर्यंत गोसेखुर्दचे पाणी नदीपात्रात पोहोचत नाही आणि तात्पुरत्या बंधाऱ्यात पाणी साचत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे अनिवार्य आहे. गाडी धुणे, अंगणात पाणी मारणे किंवा इतर कारणांसाठी पाण्याचा अपव्यय केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. “पुढील आठवड्याभरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमची संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. मात्र, तोपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गडचिरोली शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी ३० जून २०२६ पर्यंत पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा व प्रशासनाला सहकार्य करावे,” अशी विनंती पाणी पुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button