अल्पवयीन मुलीची प्रियकरासह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

विक्रोळी रेल्वेस्थानकावरील घटना
मुंबई : कुटुंबीयांकडून लग्नाला होणाऱ्या विरोधामुळे एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासह धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आयुष्य संपविले. ही धक्कादायक घटना विक्रोळी रेल्वेस्थानकात रविवारी घडली. ही मुलगी भांडुपमधून बेपत्ता होती.
भांडुपच्या हनुमाननगर येथील नितेश दंडपल्ली (२०) या तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, कुटुंबीयांना समजताच त्यांनी विरोध केला. मुलीच्या बाहेर जाण्यावरही बंधन घातले. तिला गावाला पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे तरुणाला कळताच तो शनिवारी मुलीच्या घरी गेला. त्यानंतर रविवारी सकाळी मुलगी आजीसोबत घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती.
पोलिस मुलीचा शोध घेत असतानाच, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुलगी आणि तिच्या प्रियकराने विक्रोळी रेल्वेस्थानकात गरीब रथ एक्स्प्रेसखाली उडी घेतली. रेल्वे पोलिसांनी दोघांना राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. लोहमार्ग पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



