
संसद भवनाच्या आवारात ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचे जोरदार निदर्शने
गोंदिया : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही तर देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संसद भवनाच्या आवारात खासदारांनी आपल्यासोबत दुधाचे डबे आणले आणि मगमधील दूध कॅनमध्ये ओतून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदारांनी सांगितले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची किंमत मिळाली पाहिजे, हा केवळ आर्थिक नव्हे तर त्यांचा संवैधानिक अधिकार आहे.
दूध पावडरची निर्यात सुरू करा, निर्यात थांबल्यामुळे बाजारात दूध पावडरचा साठा जमा झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदे आणि कारवाईची गरज आहे, जेणेकरून ग्राहक आणि शेतकरी दोघांचेही हित जपले जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला पाहिजे. इत्यादी मागण्या खासदारांनी सरकारसमोर ठेवल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह नीलेश लंके, शोभाताई बच्छाव, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, नामदेव किरसान, बलवंत वानखेडे, डॉ. कल्याण काळे आणि श्याम कुमार बर्वे यांसारख्या अनेक खासदारांनी केले. “शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



