गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पोलीस महासंचालकांसमोर सहा वरिष्ठ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

६२ लाख रुपयांचे होते बक्षीस ; पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, बुधवार, २४ सप्टेंबर रोजी तब्बल सहा वरिष्ठ नक्षलवाद्यांनी पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये दोन डिव्हीसीएम दर्जाच्या जोडप्यांचा समावेश आहे. या सहाही नक्षलवाद्यांवर शासनाने एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (वय ५८): डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हिजन (बक्षीस १६ लाख), विमलक्का ऊर्फ शंकरअक्का सडमेक (वय ५६): डिव्हीसीएम, माड डिव्हिजन (बक्षीस १६ लाख), कविता ऊर्फ शांती मज्जी: कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टीम (बक्षीस ८ लाख), नागेश ऊर्फ आयताल माडवी: पीपीसीएम, कंपनी क्र. १० (बक्षीस ८ लाख), समीर आयतू पोटाम: पीपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्निकल टीम (बक्षीस ८ लाख), नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा मडावी: एसीएम, अहेरी दलम (बक्षीस ६ लाख) अशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. या सहापैकी भिमन्ना-विमलक्का आणि नागेश-कविता ही दोन जोडपी आहेत. त्यांना आत्मसमर्पण योजनेअंतर्गत अतिरिक्त मदत मिळणार आहे.

शासनाच्या आत्मसमर्पण धोरणानुसार, या नक्षलवाद्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. भिमन्ना आणि विमलक्का यांना प्रत्येकी ८.५ लाख रुपये, कविताला ५.५ लाख रुपये, नागेशला ५ लाख रुपये, समीर आणि नवाता यांना प्रत्येकी ४.५ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

२००५ पासून सुरू झालेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गडचिरोली पोलीस दलासमोर आतापर्यंत ७१६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. २०२५ या वर्षातच ४० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापूर्वी, १ जानेवारी रोजी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य ताराक्का सिडामसह ११ नक्षलवादी आणि ६ जून रोजी डिव्हीसीएम सपनाक्का चौधरीसह १२ नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते.

आत्मसमर्पण कार्यक्रमादरम्यान पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी मागील काही चकमकींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी-६० जवानांचा सत्कार केला. तसेच, नक्षलवादी हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचे धनादेशही वितरित केले.

आजच्या या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान अधिक वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button