
गडचिरोलीत कारवाई ; आरोपीत अल्पवयीन मुलाचा समावेश
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी वाहनाद्वारे दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनासह एकूण ४ लाख १० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ४ नोव्हेंबर रोजी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गडचिरोली- जांभळी मार्गावर केली. याप्रकरणी जिनेश मुकेश मेश्राम (वय २६, रा. गोकुलनगर) तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गडचिरोली-जांभळी मार्गाने अवैधरीत्या दारुची वाहतूक होत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर मार्गावर सापळा रचला. दरम्यान, एमएच ३३ ए ५५०५ क्रमांकाचे एक संशयित वाहन येताना दिसून आले. सदर वाहनास थांबवून तपासणी केली असता, १८ हजार २४० रुपयांची विदेशी दारु, ४२ हजार रुपये किमतीची देशी दारु आढळून आली. पोलिसांनी दारु व ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख १० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जिनेश मुकेश मेश्राम तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक रेवनचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलिस नाईक स्वप्निल कुडावले, पोलिस शिपाई अतुल भैसारे, स्वदीप मेश्राम, सुजाता ठोंबरे यांनी केली. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. या कारवाईने दारूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



