
सायबर पोलीस ठाण्याचे यश ; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाटप
गडचिरोली : मोबाईलचा वापर दिवसागणिक वाढत आहे. पण मोबाईल हाताळताना, प्रवासादरम्यान अनेकांचे मोबाईल हरविले, तर काहींचे चोरी गेले आहेत, असे ५३ मोबाईल पोलिसांच्या सायबर शाखेने शोधून काढले. संबंधित मोबाईलधारकांना बोलवून त्यांना हे मोबाईल परत देण्यात आले.
हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलसंबंधी पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर ती सायबर पोलिस स्टेशनकडे पाठविली जाते. मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलिस स्टेशनमार्फत हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.
मागील वर्षी सन 2024 मध्ये एकुण 119 मोबाईलचा शोध घेण्यात आला होता. त्यांची अंदाजे किंमत 19 लाख 31 हजार 912 रुपये एवढी होती. तसेच सप्टेंबर 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत एकुण 53 मोबाईल शोधण्यात यश आले. त्यांची किंमत 8 लाख 55 हजार 561 रुपये एवढी आहे. हे मोबाईल ७ जानेवारी रोजी संबंधितांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग हॉल येथे बोलावून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि अरुण फेगडे, मपोउपनि नेहा हांडे, मपोहवा वर्षा बहिरवार, मनापोअं सगणी दुर्गे, पोअं संजिव लेनगुरे, पोअं दिवाकर तनमनवार यांनी पार पाडली.
सध्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलेजन्स (AI) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते, त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर १९३० या नंबरवर तक्रार नोंदवावी व मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.



