क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली हत्याकांड : खुनाचा आरोपी २४ तासांच्या आत गजाआड

वकिलाचा सल्ला घेण्यासाठी चंद्रपुरात गेलेल्या महेश बुरांडेला अटक

फर्निचर व्यवहारातील वादातून हत्या; डोळ्यांत तिखट फेकून धारदार शस्त्राने केला होता वार

गडचिरोली : शहरातील लांझेडा परिसरात फर्निचरच्या वादातून झालेल्या खळबळजनक हत्याकांडातील मुख्य आरोपी महेश महादेव बुरांडे (३४) याला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. सोमवारी भरदिवसा हत्या केल्यानंतर फरार झालेला महेश १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोलूरवार यांची हत्या केल्यानंतर आरोपी महेश बुरांडे हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. रात्रभर तो विविध ठिकाणी भटकत राहिला. कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी वकिलाचा सल्ला घेण्याच्या उद्देशाने तो मंगळवारी सकाळी चंद्रपुरात पोहोचला होता. मात्र, गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचे लोकेशन शोधले आणि चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या.

मृतक सचिन कोलूरवार (३५, रा. विवेकानंदनगर) यांनी महेश बुरांडेला फर्निचर बनवण्यासाठी १० हजार रुपये दिले होते. याशिवाय, पुण्यात बदली झालेले पोलीस निरीक्षक किरण देशमुख यांचेही २०१० मधील दीड लाख रुपयांचे फर्निचर महेशने अद्याप दिले नव्हते. याचा पाठपुरावा सचिन आणि त्यांचा मित्र दीपक नंदेश्वर करत होते. सोमवारी दुपारी सचिन आणि दीपक फर्निचर आणण्यासाठी महेशच्या घरी गेले. मात्र, काम अपूर्ण असल्याचे पाहून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी महेशने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने अचानक सचिनच्या डोळ्यांत मिरचीचे तिखट फेकले. सचिनला काहीही सुचेनासे झाले असतानाच, महेशने फर्निचर बनवण्याच्या धारदार ‘वाकसाने’ त्यांच्या छातीवर भीषण वार केले. या हल्ल्यात सचिन यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर सचिनचा मित्र दीपक नंदेश्वर याच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात महेश बुरांडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे. जिल्हा मुख्यालयात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. मात्र, आरोपीला तातडीने अटक केल्यामुळे गडचिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button