क्राईमनागपूरविदर्भ

रेल्वेत प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या तोतया टीसीला अटक

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनीच पकडून केले खऱ्या टीसींच्या स्वाधीन

नागपूर : रेल्वेत कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात एक तरुण तोतया टीसी बनला. त्याने गणवेश परिधान करून विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करायला सुरुवात केली, पण प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्याचा भांडाफोड झाला. ही घटना नागपूर ते बोरखेडीदरम्यान दक्षिण एक्स्प्रेसमध्ये घडली. दिग्विजयसिंग जाटव (२४, रा. मूल, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर दक्षिण एक्स्प्रेस आल्यानंतर आरोपी दिग्विजयसिंग जाटव जनरल डब्यात बसला. गाडी सुटल्यावर नागपूर ते बोरखेडीदरम्यान त्याने टीसीचा गणवेश घालून प्रवाशांची तपासणी सुरू केली. त्याला तीन विनातिकीट प्रवासी दिसले. त्याने त्यांच्याकडून नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. पण, प्रवाशांनी पावती मागितल्यावर आरोपीने पावती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संशय आल्याने प्रवाशांनी दंड देण्यास नकार दिला. यानंतर, तो पुढे गेला आणि त्याने दुसऱ्या दोन प्रवाशांकडून १५०० रुपये दंड वसूल केला, पण त्यांनाही पावती दिली नाही. त्याचवेळी, मुख्य तिकीट निरीक्षक सुभाषचंद्र महाराणा आपल्या सहकाऱ्यांसह त्याच डब्यात पोहोचले. त्यांना पाहताच तोतया टीसीने पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच, ज्या प्रवाशांकडून त्याने पैसे घेतले होते, त्यांनी त्याला पकडले आणि खऱ्या टीसींच्या स्वाधीन केले.

लोहमार्ग पोलिसांनी आरोपी दिग्विजयसिंगला अटक केली आहे. तपासणीत त्याच्यावर झाशी आणि बैतूल रेल्वेस्थानकांवरही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्याला मोबाईल चोरी प्रकरणी झाशी कारागृहात १४ महिने आणि बैतूल कारागृहात सहा महिने शिक्षाही झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button