क्राईमचंद्रपूरविदर्भ

देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, दोघांना अटक

घुग्घुस शहरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घुस शहरात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शास्त्रीनगर येथील एका घरातून गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करत, पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना शनिवारी (२६ जुलै) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध शस्त्रांच्या तस्करीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना, त्यांना घुग्घुस हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात अग्निशस्त्र (आग्नेयास्त्र) लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवली आणि सोनूलाल उर्फ नन्नू कैथल (वय २८, रा. घुग्घुस) याच्या घरावर धाड टाकली.

या धाडीत पोलिसांना नन्नू कैथलच्या घरातून एक गावठी बनावटीचा देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. हा देशी कट्टा त्याने आपला मित्र मासिन निसार शेख (वय २८, रा. घुग्घुस) याच्याकडून खरेदी केल्याचे नन्नूने सांगितले. या कबुलीजबाबवरून पोलिसांनी तात्काळ मासिन शेखलाही ताब्यात घेतले. दोघांवरही कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे आदींचा समावेश होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, यामागे आणखी कोण सामील आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button