
गडचिरोली : शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या सेमाना जंगल परिसरात वाघाचा संचार असल्याचे मंगळवारी (दि. 30) वाघाने म्हशीला ठार केल्याच्या घटनेवरून उघडकीस आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शहरापासून 3 किमी असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात झुडूपी जंगल आहे. या जंगलात गोकुलनगर येथील नामदेव वैरागडे यांची म्हैस चरण्यासाठी गेली असता, वाघाने म्हशीला ठार केले. म्हैस घरी न आल्याने वैरागडे यांनी सेमाना जंगल परिसरात शोध घेतला असता, ही घटना उघडकीस आली. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून शहानिशा केली. याप्रसंगी बुधवारी (दि. 31) रात्रीच्या सुमाराला मृत म्हशीजवळ वाघ कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर क्षेत्रात सतर्कतेचे बॅनर लावले आहे. रात्री बाहेर पडताना टार्च व लाठी सोबत ठेवावी, लहान मुलांना एकटे बाहेर ठेऊ नये, दोन-तीन किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने एकत्रित जावे, मोबाइलवर गाणे वाजवित जावे, वाघ दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये, असे आवाहन वनविभागाने फलक लावून केले.



