क्राईमगडचिरोलीविदर्भ

कत्तलीसाठी जाणाऱ्या ४७ जनावरांची सुटका

१४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, गोवंश तस्कर जेरबंद

गडचिरोली : सिरोंचा पोलिसांनी गोवंश तस्करीचा एक मोठा कट उधळून लावत मोठी कारवाई केली आहे. एका ट्रकमधून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ४७ गायी आणि बैलांना पोलिसांनी वाचवले असून, १४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडसी कारवाईमुळे गोवंश तस्करांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

९ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता सिरोंचा पोलिसांना एका ट्रकमधून (क्र.सीजी १५ – ए ८०५४) गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात अत्यंत क्रूरपणे कोंबलेली ४७ गायी आणि बैल आढळले.

पोलिसांनी त्वरित ट्रक जप्त करून चालक मेहबूब खान असिफ खान (वय ३९, रा. पार्वतीनगर, नागपूर) आणि त्याचा साथीदार शेख नसीम शेख यासिन (वय ३८, रा. पठाणपुरा ता.मूर्तिजापूर जि.अकोला) यांना अटक केली. ४ लाख ७० हजार रुपये किमतीची जनावरे आणि १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीवर महाराष्ट्र प्राणी छळवणूक प्रतिबंधक कायदा आणि प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाचवलेल्या सर्व गोवंश जनावरांना चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांची देखभाल आणि उपचार सुरू आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button