
प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
गोंदिया : कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींची रस्त्यात छेड काढणाऱ्या पिंटू ऊर्फ विकास टेंभुर्णीकर (३३, रा. म्हसगाव, ता. गोरेगाव) याला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व सहा हजार ५०० रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी गुरुवारी (दि.१६) प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली आहे.
२८ जुलै २०१७ रोजी सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास आरोपी पिंटू टेंभुर्णीकर व त्याचा मित्र नामे नरेश रमानी भास्कर (३१) याच्या सोबत एकाच मोटारसायकलवरून गोरेगाव येथील कॉलेज करून सायकलने आपल्या घरी मैत्रिणीसोबत परत जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा मोटारसायकलने पाठलाग करून तिच्या डोक्यावर हाताने मारले. ज्यामुळे पीडिता ही सायकलवरून खाली पडली व तिच्या हाताला किरकोळ जखम झाली. दोघे आरोपी पीडित मुलगी खाली पडल्यावर तिच्यावर हसत होते. या प्रकरणात पीडितेतर्फे अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा पारधी, यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शन व पोलिस निरीक्षक भुसारी यांच्या देखरेखीत, पोलिस पैरवी कर्मचारी प्रकाश सिरसे यांनी उत्कृष्ट काम केले.
या प्रकरणात आरोपी नरेश भास्कर याचा प्रकरण न्यायालयात सुरू असताना आकस्मिक मृत्यू झाल्याने हे प्रकरण आरोपी विकास टेंभुर्णीकर याचे विरुद्धच न्यायालयात पुढे चालविण्यात आले.
आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पीडित पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वसंत चुटे यांनी न्यायालयासामोर एकूण ५ साक्षीदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली.



