
छत्तीसगडमधील पावसाने पूर, सालेकसाजवळील नाल्यावर थरारक बचावकार्य
सालेकसा : शेजारच्या छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बेवारटोला धरण ओव्हरफ्लो झाले. यामुळे सालेकसा तालुक्यातून वाहणाऱ्या कुआढास नाल्याला अचानक मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यातून जांभळी गावाजवळील पुलावरून जात असलेली एक पिकअप गाडी वाहून गेली. मात्र, ती एका मोठ्या दगडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि गावकऱ्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे गाडीतील दोन तरुणांचा जीव वाचला.
रविवारी सकाळपासून सालेकसा तालुक्यात हवामान निरभ्र होते. मात्र, सकाळी १० वाजता अचानक कुआढास नाल्याला पूर आला. याचवेळी जांभळी गावाजवळच्या पुलावरून जात असलेली पिकअप गाडी पुराच्या प्रवाहाच्या तडाख्यात सापडली आणि वाहू लागली. गाडीत असलेले दोन युवक मदतीसाठी ओरडू लागले. काही अंतरावर ती गाडी एका मोठ्या दगडाला अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे पाण्यात बुडाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी वेळ न दवडता बचावकार्य सुरू केले. त्यांनी नाल्याच्या दोन्ही बाजूने दोरी टाकली आणि गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावकऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्यांना अक्षरशः नवजीवन मिळाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भूषण बुराडे आणि तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत गावकऱ्यांनी बचावकार्य यशस्वी केले होते. अचानक आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देणाऱ्या गावकऱ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



