गोंदियाविदर्भ

भर पावसाळ्यात गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

नळ योजना महिनाभरापासून बंद, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप ; दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

तिरोडा : तालुक्यातील सुकडी डाकराम येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळ योजना गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ही नळ योजना मंजूर करण्यात आली होती. याचे काम भंडारा येथील अरविंद कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते, ज्याने एका स्थानिक कंत्राटदाराला हे काम दिले. मात्र, कंत्राटदाराने पाइपलाइनची जोडणी योग्य प्रकारे केली नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. गावातील अनेक भागांमध्ये पाणी पोहोचतच नाही. जुन्याच विहिरी आणि पाण्याच्या टाकीचा वापर करून ही योजना सुरू करण्यात आली, पण पाणीपुरवठा अनियमित असल्याने समस्या कायम आहे.

या समस्येबद्दल सरपंच सुनील मेश्राम यांना विचारले असता, त्यांनी नळ योजनेची मोटर जळाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ही योजना जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असून, कंत्राटदार देखील लक्ष देत नाही. सरपंचानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी, अद्याप कंत्राटदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

गेल्या पावसाळ्यातही नळ कनेक्शनधारकांना दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाला होता, पण तेव्हाही प्रशासनाने दखल घेतली नाही. कंत्राटदाराच्या मनमानीमुळे ही नळ योजना कुचकामी ठरली आहे. सध्या, महिलांना दीड किलोमीटर दूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे, ज्यामुळे खासगी विहिरींवर गर्दी वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button