क्राईमभंडाराविदर्भ

पोलिसांचा आयपीएल सट्टेबाजीवर मोठा प्रहार; क्रिकेटवर ऑनलाइन सट्टा लावणारे दोघे गजाआड

गणेश मंदिरामागील अड्ड्यावर छापा; १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

तुमसर : देशभरात सध्या आयपीएलचा (IPL) फिव्हर असतानाच, तुमसर शहरात या सामन्यांवर अवैधपणे सट्टा लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोसनगर येथील गणेश मंदिराच्या मागे सुरू असलेल्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून तुमसर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दीपक सेवकराम ऊईके (३५, रा. माकडे वार्ड, तुमसर) हा आरोपी बोस नगर परिसरातील गणेश मंदिरामागे बसून ‘कोलकाता नाईट रायडर्स’ विरुद्ध ‘दिल्ली कॅपिटल्स’ या सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाइन सट्टा घेत होता. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि अचानक धाड टाकली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी दीपक ऊईके याच्याकडून जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, हा सट्टेबाजीचा व्यवसाय त्याने पवन मोरेश्वर खरवडे (२५, रा. तुमसर) याच्याशी संगनमत करून सुरू केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला आहे.

तुमसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल फोन्स आणि जुगाराचे साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी हवालदार धर्मेंद्र हरिदास भोंडेकर यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button