क्राईमचंद्रपूरविदर्भ

कृषी विभागाची मोठी कारवाई; रेल्वे स्थानकावरून १०.१२ लाखांचे अनधिकृत ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे जप्त

विजयवाडा येथून पाठवलेला संशयास्पद साठा पार्सल कार्यालयातून जप्त; बंदी असलेल्या बियाण्यांच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

बल्लारपूर : खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आणि बंदी असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. अशाच एका मोठ्या रॅकेटचा बल्लारपुरात कृषी विभागाने मंगळवारी (दि. १६ जून) धडक कारवाई करत पर्दाफाश केला. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून रेल्वे पार्सलद्वारे आलेले तब्बल १० लाख १२ हजार रुपये किमतीचे अनधिकृत व संशयास्पद ‘एचटीबीटी’ (HTBT) कापूस बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत बियाणे विकणाऱ्या आणि बोगस बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी लकेश कटरे यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात १० मोठ्या प्लास्टिक पिशव्या व २ छोट्या पिशव्यांमधून संशयास्पद कापूस बियाणे आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. हा मोठा साठा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील ‘सईद इंटरप्रायझेस’कडून बल्लारपूर येथील ‘इम्तियाज’ नामक व्यक्तीसाठी पाठविण्यात आला होता.

हा बेकायदेशीर साठा जप्त करण्यासाठी कृषी विभागाने सापळा रचला होता. मात्र, रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली जाणवल्यामुळे बियाणे घेण्यासाठी मुख्य संशयित आरोपी इम्तियाज किंवा ते पाठवणारी कंपनी यापैकी कोणीही रेल्वे स्थानकावर फिरकले नाही. अखेर १६ जून रोजी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे व तालुका कृषी कार्यालय बल्लारपूरच्या बियाणे निरीक्षक पल्लवी गोडबोले यांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जात या सर्व पार्सलची कसून तपासणी केली.

कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ५३३ क्विंटल ३० किलोग्रॅम वजनाचे अनधिकृत, विनापरवाना व बीज प्रक्रिया केलेले कापूस बियाणे आढळून आले. कृषी विभागाने हा सर्व १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला असून पुढील कायदेशीर व फौजदारी कारवाईसाठी तो बल्लारशाह जीआरपी (रेल्वे पोलीस) ठाण्याच्या सुपुर्द केला आहे. या प्रतिबंधित बियाण्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आणि ते मागवणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button