गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

डॉक्टर व परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील घटना ; जिल्हा प्रशासनाने डॉक्टर आणि परिचारिकेची सेवा केली समाप्त

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातल्या विसोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. मनिषा शत्रुघ्न धुर्वे (३१), रा. विसोरा असे मृत महिलेचे नाव आहे. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांच्या संताप तसेच शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करत विसोरा येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मुंडले आणि कंत्राटी परिचारिका उषा उके यांची सेवा कायमची समाप्त केली आहे.

विसोरा येथील मनिषा धुर्वे हिची पहिलीच प्रसूती होती. त्यासाठी तिला १३ एप्रिलला गावातीलच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर बराच वेळ होऊनही मनिषाची प्रसूती झाली नाही. त्यामुळे मनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावून तिला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यास डॉक्टरांनी नकार दिला. तब्बल १२ तास उलटूनही मनिषा प्रसूत झाली नाही. शेवटी तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनीही प्रसूती होईल, असे सांगितले. परंतु प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांना १४ एप्रिलच्या संध्याकाळी तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला.

आज देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान गावकऱ्यांनी आंदोलन करीत दोषी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करेपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला. प्रशासनाने जिल्हा माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करत अखेर डॉ. मुंडले आणि परिचारिका उके यांची सेवा कायमस्वरूपी समाप्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button