
जिल्हाधिकारी मंदार पत्की अन् आमदार संजय पुराम यांची उपस्थिती; महिलांना ‘शेतकरी’ दर्जा प्रमाणपत्र, सनदा व रस्ते मंजुरीचे वाटप
गोंदिया : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रलंबित समस्या व तक्रारींचे एकाच छताखाली तत्काळ निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज ‘राजस्व-समाधान’ (तक्रार निवारण) शिबिर विजयलक्ष्मी हॉल, आमगाव येथे नुकतेच पार पडले. जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकाच दिवशी तब्बल २,४७० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पंचायत समिती आमगावच्या सभापती योगिता पुंडे, सालेकसा सभापती विनताई कटरे, देवरी सभापती अनिलकुमार भिसेन, जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार मोनिका कांबळे यांनी शिबिराच्या आयोजनाची सविस्तर पार्श्वभूमी मांडली.
या विशेष शिबिरात महिलांच्या नावावर जमिनीचे हक्क स्पष्ट करत त्यांना ‘शेतकरी’ दर्जा देणारी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. गावठाण वस्तीतील नागरिकांना मालकी हक्काच्या सनदा देण्यात आल्या, तसेच शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतची प्रक्रिया राबवण्यात आली. ‘मुख्यमंत्री बलिराजा शेत/फार्म ॲक्सेस रोड योजने’अंतर्गत पांदण रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. यासोबतच ‘जीवंत सातबारा’ अभियानाची माहिती देऊन जमिनींचे हस्तांतरण सुलभ करण्यात आले. कुंभार समाजासाठी विशेष सवलती, कृषी जमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी, राजमाता जिजाऊ महिला सशक्तीकरण योजना आणि विस्थापितांच्या जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठीच्या ‘स्पेशल अमनेस्टी स्कीम-२०२५’ बाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार संजय पुराम यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, अधिकारी वर्गाने नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लालफितीचा कारभार न करता तातडीने व प्रभावीपणे मार्ग काढावा, अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी आमगाव, देवरी व सालेकसा क्षेत्रातील महसूल यंत्रणेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबीरामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयांचे फेरे वाचले असून अनेक किचकट समस्यांचे जागीच निवारण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



