गोंदियाविदर्भ

‘स्क्रब टायफस’ आजाराचा धोका वाढला ; नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार

गोंदिया : पावसाळ्यात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात ‘स्क्रब टायफस’ या दुर्मीळ आजाराचे रुग्ण आढळत आहेत. राज्याच्या सूचनांनुसार, गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना या आजाराविषयी व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी हा आजार जंगलव्याप्त व ग्रामीण भागात आढळणाऱ्या विशिष्ट किड्याच्या चाव्यामुळे पसरतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणे हाच यावरचा महत्त्वाचा उपाय असल्याचे सांगितले.

‘स्क्रब टायफस’ हा ‘ऑरियंटा सुट्सुगामुशी’ नावाच्या जिवाणूमुळे होणारा आजार आहे. हा जिवाणू ‘चिगर माइट्स’ (Chigger Mites) नावाच्या एका विशिष्ट किड्याच्या चाव्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतो. हे कीटक प्रामुख्याने गवत, शेत, जंगल आणि झुडपांमध्ये आढळतात.

आजाराची लक्षणे: तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, आणि अंगावर पुरळ येणे. काही रुग्णांमध्ये कीटक चावल्याच्या ठिकाणी व्रण (wound) दिसतो. चालताना तोल जाणे, सुस्ती येणे आणि कोरडा खोकला. हा आजार वेळीच ओळखला न गेल्यास गंभीर रूप धारण करू शकतो आणि मृत्यूचे प्रमाण ३०% पर्यंत असू शकते.

काय काळजी घ्यावी? : शेतात किंवा झुडपांमध्ये काम करताना संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे, हातमोजे आणि गमबूट वापरा. घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत आणि झुडपे नियमितपणे काढून टाका. माईट (कीटक) नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकाचा वापर करा. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी सांगितले की, या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी वेळेवर निदान आणि प्रतिजैविके (antibiotics) घेतल्यास या रोगावर नियंत्रण मिळवता येते, असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button