
ग्रामस्थांच्या एकजुटीने अवैध दारूविक्रेत्यांना धाक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील चुटगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टिकेपल्ली या गावाने दारूबंदीच्या अंमलबजावणीमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. मागील १० वर्षांपासून या गावात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद झाली असून, एकेकाळी १० दारूविक्रेते सक्रिय असतानाही ग्रामस्थांनी एकजुटीने घेतलेल्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. एका विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करताच, इतर सर्व अवैध दारूविक्रेत्यांनी आपला व्यवसाय थांबवला आणि तेव्हापासून गावात दारूबंदी कायम आहे.
२०१५ पूर्वी टिकेपल्ली गावात दारूविक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली होती. जवळपास ८ ते १० दारूविक्रेत्यांमुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली होती, ज्यामुळे सामाजिक वातावरण दूषित झाले होते. या परिस्थितीला कंटाळून, चुटगुंटा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये दारूविक्री पूर्णपणे बंद असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी टिकेपल्ली गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी बैठक घेऊन गावात दारूविक्री होणार नाही, असा ठाम ठराव घेतला. विशेष म्हणजे, जर कोणी दारूविक्री करताना आढळल्यास ४० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असेही या ठरावात निश्चित करण्यात आले.
ठराव झाल्यानंतरही काही विक्रेत्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले आणि आपला अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. यावर ग्रामस्थांनी अत्यंत संयमाने परंतु ठामपणे पाऊल उचलले. त्यांनी निर्णयानुसार अहिंसक कृती करत एका दारूविक्रेत्याकडून दारू जप्त केली आणि ठरवल्याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या एका कारवाईने इतर सर्व दारूविक्रेते धास्तावले. त्यांना ग्रामस्थांच्या एकजुटीची आणि निर्णयाच्या अंमलबजावणीतील कठोरतेची जाणीव झाली, ज्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय तात्काळ बंद केला. तेव्हापासून, गेल्या १० वर्षांपासून टिकेपल्ली गावात दारूविक्री पूर्णपणे बंद असून, ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थ आजही सक्रिय आहेत.
मुक्तिपथ तालुका चमूतर्फे ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. यासाठी तुळशीराम मडावी (मुक्तीपथ संघटना अध्यक्ष), मारोती नैताम (मुक्तिपथ संघटना सचिव), चंद्राजी कोरेत (पो.पा.),अजय नैताम (वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष), किशोर नैताम, विलास टेकुलवार, गंगाधर टेकुलवार, भीमराव कोरेत, सुरेखा मडावी (ग्रा.संघ अध्यक्ष), शारदा नैताम, सुनिता कोरेत, जिवनकला शेडमाके, दिपीका समद्दार यांनी पुढाकार घेतला.



