
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील शेतात विहिरीत पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. ११) सायंकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरदोली येथील शेतकरी रोशनलाल कटरे हे शनिवारी सायंकाळी आपल्या शेतातील (सर्व्हे नंबर १८१) पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतात फिरत असताना त्यांना विहिरीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना पाण्यात वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला. ही भयावह दृश्य पाहून त्यांनी त्वरित सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे (NNTR) उपसंचालक प्रितमसिंह कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वनविभागाने मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पंचनामा केला आहे. वाघ नेमका विहिरीत कसा पडला? पाण्याचा अंदाज न आल्याने चुकून पडला की, यामागे काही शिकारीचा किंवा अन्य संशयास्पद प्रकार आहे, याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे.
वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे मुरदोली व आसपासच्या परिसरात मोठी चर्चा सुरू असून, वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृत वाघाला विहिरीबाहेर काढून नियमानुसार पुढील सर्व कायदेशीर कार्यवाही आणि तपास केला जात आहे.
प्रितमसिंह कोडापे उपसंचालक, एनएनटीआर, गोंदिया



