क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

उधारीच्या पैशांवरून युवकाची भरदिवसा निर्घृण हत्या; लांझेडा परिसरातील धक्कादायक घटना

पैसे घेण्यासाठी बोलावून केला जीवघेणा हल्ला ; जिल्हा मुख्यालयात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे शहर असलेल्या गडचिरोली शहरातील लांझेडा परिसरात उधारीच्या पैशांच्या वादातून एका युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१६ मार्च) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सचिन कोल्लुरवार (रा. विवेकानंदनगर, गडचिरोली) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लांझेडा परिसरातील काही फर्निचर कामगारांना सचिन ने काही रक्कम उधारी म्हणून दिली होती. सचिन मागील काही दिवसांपासून या पैशांचा तगादा लावत होते. आरोपींनी पैसे देण्याचे मान्य करून सचिन ला सोमवारी पैसे नेण्यासाठी लांझेडा येथे बोलाविले. सचिन विश्वासाने पैसे घेण्यासाठी गेला असता, तिथे आरोपींसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी धारदार शस्त्राने सचिन याच्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सचिनचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून, तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांची ओळख पटवली असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा अशी घटना घडल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फर्निचरच्या कामाच्या आडोशाने चालणाऱ्या या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गडचिरोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button