क्रीडागडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोलीत रंगणार सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचा महाकुंभ!; पोलीस दलातर्फे भव्य ‘गडचिरोली महोत्सव’ व ‘महामॅरेथॉन’चे आयोजन

सुरेश वाडकर, भारत गणेशपुरे यांच्यासह नामांकित कलाकारांची हजेरी; विजेत्यांना ४ लाखांहून अधिकची बक्षिसे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि माओवादग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने कंबर कसली आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि ‘प्रोजेक्ट उडान’च्या यशानंतर आता येथील कलागुणांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २५ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान भव्य ‘गडचिरोली महोत्सव’ आणि २८ डिसेंबर रोजी ‘महामॅरेथॉन २०२५ (सीझन-३)’ चे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ ते २७ डिसेंबर या काळात हा महोत्सव रंगणार आहे. क्रीडा स्पर्धा: वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आणि बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा. सांस्कृतिक वैभव: अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी ‘आदिवासी समूह नृत्य स्पर्धा’. प्रदर्शनी व विक्री: जिल्ह्यातील महिला बचत गट आणि विविध संस्थांचे उत्पादने, हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स. हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल.

२६ व २७ डिसेंबर रोजी संध्या. ६ ते १० वाजता सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने गडचिरोलीकर मंत्रमुग्ध होणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक: सुरेश वाडकर, पद्मनाभन गायकवाड आणि निरंजन बोबडे. विनोद आणि अभिनय: भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी (चला हवा येऊ द्या फेम). स्थानिक व गोंडी स्टार्स: ममता उईके व अर्जुन धोपटे (‘ओ सांगो’ फेम) आणि माधुरी पवार. यासोबतच स्थानिक कलाकारांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

२८ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणातून महामॅरेथॉनचा थरार सुरू होईल. यात जिल्ह्यातील १४००० हुन अधिक स्पर्धक सहभाग होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून त्यामध्ये २१ किमी, १० किमी, ०५ किमी, ०३ किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सहभागी होणाऱ्या धावपटुंना टी-शर्ट, मेडल, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झुंबा सेशन, अल्पोपहार व विजेत्यांसाठी स्पर्धकांना पुरुष व महिला या वेगवेगळ्या दोन्ही प्रवर्गामध्ये २१ कि. मी गटात प्रथम ५१,०००/- द्वितीय ३१०००/- व तृतीय २१०००/- रुपये, १० कि.मी गटात प्रथम २१,०००/- द्वितीय १५०००/- व तृतीय ११०००/-, ०५ कि.मी गटात प्रथम १५,०००/- द्वितीय ११०००/- व तृतीय ८०००/- व ०३ कि.मी गटात प्रथम ११,०००/-द्वितीय ७०००/- व तृतीय ३०००/- रुपये असे एकूण ४,१४,०००/- रुपयांच्या बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे.

“हा महोत्सव केवळ मनोरंजनासाठी नसून जिल्ह्याच्या विकासाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. सर्व खेळाडू आणि कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी गडचिरोलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे.” असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

नियोजनासाठी पोलीस दल सज्ज

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्यासह सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार या महोत्सवाच्या तयारीत अहोरात्र व्यस्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button