
कलशयात्रा, गोमाता पूजन आणि धर्मध्वजारोहणाने परिसर भक्तीमय ; हिंदू एकतेसाठी संघटित होण्याचे आवाहन
देसाईगंज : सनातन संस्कृतीचे रक्षण, हिंदू धर्माची जागृती आणि सामाजिक एकतेचा दृढ संदेश देण्यासाठी पोटगाव येथे ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ अभूतपूर्व उत्साहात पार पडले. सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्याला हजारो हिंदू बांधवांनी उपस्थित राहून आपल्या संस्कृतीप्रती निष्ठा व्यक्त केली. विशेष म्हणजे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या मूळ गावी या कार्यक्रमात सहभागी होत गोमाता पूजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता भव्य कलशयात्रेने झाली. संपूर्ण पोटगाव परिसरातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत हजारो हिंदू बांधव पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. जय श्री रामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर ६ वाजता विधीवत धर्मध्वजारोहण, गोमाता पूजन आणि कन्या पूजन पार पडले.
विदर्भ प्रांत सेवा कार्य प्रमुख सुनील मेहेर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “हिंदू जागृतीसाठी आता संघटनात्मक कार्याची नितांत गरज आहे. सामाजिक एकतेनेच आपला समाज मजबूत होईल. प्रत्येक गावात अशा संमेलनांची आवश्यकता असून, हिंदू समाजाने आता स्वाभिमानाने आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे. संघाच्या शाखांच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वयंसेवक बनावे.”
ह.भ.प. श्री. पुंडलिक नागपुरकर महाराज (कुंभीटोला) यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की, “आधुनिक काळात आपण कितीही प्रगती केली तरी आपल्या संस्कृतीचे मूळ सोडू नये. सनातन धर्माच्या रक्षणासाठी संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक हिंदूने स्वतःला धर्माचा रक्षक मानले पाहिजे.”
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी गोमातेचे पूजन करून उपस्थितांना संबोधित केले. “आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
सायंकाळी ७ वाजता सामूहिक भारतमाता आरती आणि भजनसंगीताचा कार्यक्रम झाला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ७:३० वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाज पोटगाव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोटगावच्या या संमेलनाने संपूर्ण परिसरात हिंदू धर्माच्या जागृतीची एक नवी लाट निर्माण केली असून, समाजमनात नवी चेतना जागृत झाली आहे.



