
अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य विभाग आणि सायकलिंग संडे ग्रुपचा पुढाकार
गोंदिया : महाराष्ट्रात अवयवदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सुरू झालेल्या ‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियानांतर्गत गोंदियात सायकल रॅली काढण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या उपक्रमात आरोग्य अधिकारी आणि सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले.
के.टी.एस. सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अवयवदानाचा संकल्प करून प्रतिज्ञा घेतली. या रॅलीत अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकिशोर पारधी, नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले, योगशिक्षिका मनीषा पशिने आणि ‘सायकलिंग संडे ग्रुप’च्या मंजू कटरे व रवी सपाटे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. शहरातील विविध भागांत पोस्टरच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करण्यात आली.
डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दुसऱ्यासाठी जीवनदान ठरू शकतात. अवयवदान ही काळाची गरज असून, प्रत्येकाने याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे.” नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती देताना डॉ. तृप्ती कटरे यांनी सांगितले की, अवयवदानाची इच्छा असणारे नागरिक आता गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागात किंवा ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (NOTTO) च्या वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करू शकतात.



