
गडचांदूर-राजुरा मार्गावर भीषण अपघात
कोरपना : गडचांदूर-राजुरा मार्गे बल्लारपूरकडे दुचाकीने जाताना दुभाजकाला आदळून खाली कोसळताच भरधाव ट्रकने युवक व युवतीला चिरडले. दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. ही भीषण घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता होली फॅमिली शाळेजवळ घडली. आकाश भोयर (३२) आणि प्रणाली पुसाम (२२), (दोघेही रा. पाटण, ता. बेला, जि. आदिलाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
आकाश भोयर आणि प्रणाली पुसाम हे दोघे एम.एच. ३४ ए. वाय. १८३५ क्रमांकाच्या दुचाकीने बल्लारपूर येथील नातेवाइकांकडे जात होते. दरम्यान, आकाशने एमएच ३४ एबी ४२८६ क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी दुभाजकाला आदळली. त्यामुळे संतुलन गमावून दोघेही ट्रकच्या मागील चाकाखाली आले. या भीषण अपघातात प्रणाली पुसाम हिचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी आकाशला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक बल्लारपुरातीली निर्भय ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे.
गडचांदूर पोलिसांनी चालक पतनदेव सोमनकर (२७, रा. पोंभूर्णा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



