गडचिरोलीविदर्भ

अहेरी वनपरिक्षेत्रातील ३० हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वन आणि पोलीस विभागाचा मोठा फौजफाटा तैनात; भविष्यात अतिक्रमण केल्यास तीव्र कारवाईचा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा इशारा

अहेरी : अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव वनातील तब्बल ३० हेक्टर वनजमिनीवर काही नागरिकांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण वनविभागाच्या पथकाने अत्यंत धाडसी मोहीम राबवून हटविले आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनात वन आणि पोलीस विभागाच्या मोठ्या फौजफाट्यासह, अनेक जेसीबी आणि आधुनिक यंत्रांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे वनजमिनी हडपणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भविष्यात वनजमिनीवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास अशाच पद्धतीने अतिशय कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा वनविभागाने दिला आहे.

अहेरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खमनचेरू अंतर्गत नियतक्षेत्र तानबोडीमधील राखीव वन कक्ष क्र. १२ मध्ये काही नागरिकांनी वनविभागाची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा कायदेशीर हक्क नसताना ३० हेक्टर वनजमिनीवर ताबा मिळवला होता. ही अफाट वनजमीन वृक्षतोड करून शेतीसाठी उपयोगात आणली जात होती. वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा पर्दाफाश झाला.

या कारवाईचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. पी. नरवणे, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले आणि उपविभागीय वनअधिकारी एस. जी. पवार यांच्या विशेष मार्गदर्शनात ही मोहीम आखण्यात आली. कारवाईच्या वेळी अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे, आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. जी. गणवीर, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. टी. चौके, नायब तहसीलदार प्रतिक आढाव, तसेच अहेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षल एकरे हे स्वतः कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दलासह उपस्थित होते.

या अवाढव्य मोहिमेमध्ये फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उसेंडी, खमनचेरूचे क्षेत्र सहाय्यक बी. ए. तुरानकर, तानबोडीचे वनरक्षक बी. ए. सायंकार, वनपाल एस. टी. सहारे, एस. एम. पडालवार, पी. एस. घुटे, बुद्धावार, आर. आर. डांगरे, बाबुराव मद्देलावार, रंगवार, वनरक्षक शाहजतअली कादरी, एस. जी. उराडे, सी. डी. नागुलवार, एस. आर. खापरे, कुमोटी, दिलीप मिच्चा, कुनघाडकर, नमीता दब्बा, पुजा कुसराम, सुनिता लेकामी यांच्यासह आलापल्ली, अहेरी व पेरमिली परिक्षेत्रातील इतर शेकडो क्षेत्रीय वनकर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात होते. सर्वांनी मिळून जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ अतिक्रमण निष्कासित करून वनजमीन पूर्णपणे मोकळी केली.

या धडक कारवाईमुळे वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जरब निर्माण झाली आहे. भविष्यात वनजमिनीवर कोणीही अतिक्रमण करू नये, तसे आढळल्यास त्यांच्यावर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अहेरीचे वनपरिक्षेत्राधिकारी एन.डी.इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button