देश -विदेशमहाराष्ट्रमुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जंतर-मंतरवर विराट आंदोलन; २९ जुलैला देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार

नवी दिल्ली : व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्यांसाठी २९ जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विराट राष्ट्रीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल, वेब पोर्टल, युट्यूब, दैनिक, साप्ताहिक, मासिक, फ्रीलान्स, ग्रामीण तसेच जिल्हास्तरीय पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या राष्ट्रीय आंदोलनापूर्वी संपूर्ण देशभर महिनाभर राज्य व जिल्हा मुख्यालयांवर टप्प्याटप्प्याने धरणे, निदर्शने, मोर्चे आणि निवेदन देण्याचे आंदोलन राबविण्यात येणार असून, या सर्व आंदोलनांचा समारोप २९ जुलै रोजी जंतर-मंतरवरील विराट राष्ट्रीय आंदोलनाने होणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारसमोर पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित ५० महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मागण्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कठोर कायदेशीर तरतुदी, सामाजिक सुरक्षा, आरोग्य व अपघात विमा, पेन्शन योजना, गृहनिर्माण योजना, ग्रामीण, फ्रीलान्स आणि डिजिटल पत्रकारांना मान्यता, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, शासकीय जाहिरात धोरणात पारदर्शकता तसेच राष्ट्रीय पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील सर्व पत्रकारांना या राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही एका माध्यमातील किंवा एका वर्गातील पत्रकारांसाठी नसून, देशातील प्रत्येक पत्रकाराच्या सन्मान, सुरक्षितता, सामाजिक हक्क आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठीचा हा सामूहिक लढा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा भविष्यात यापेक्षाही व्यापक आणि अधिक प्रभावी लोकशाही आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशभरातील पत्रकारांनी राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या ऐतिहासिक राष्ट्रीय आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संदीप काळे आणि अनिल म्हस्के यांनी सांगितले की, जंतर-मंतरवरील आंदोलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशाच्या विविध राज्यांतून पत्रकार दिल्लीत दाखल होणार आहेत. पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button