
अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : जरीपटका परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गॅस कटरचा वापर करून चोरट्यांनी ८ लाख १२ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली असून, जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पाटणकर चौक येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडले असल्याची माहिती बँक चॅनल सुपरवायझर प्रशांत पांडे यांनी शाखा व्यवस्थापक आसिम अख्तर खलीक अन्सारी यांना दिली. माहिती मिळताच अन्सारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे पाहणी केली असता, एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५, ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.



