
गोंदिया : सध्या महिलांमध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण आणि ट्रेंड वाढला आहे. भारतातील दोन पुरुषांपैकी एक आणि १० पैकी एक महिला हे धूम्रपानाच्या स्वरूपात तंबाखूचा वापर करतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीवरून समजते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अनेक आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. सध्या महिलांमधील धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी वय, सामाजिक-आर्थिक स्थिती, मानसिकता आणि सांस्कृतिक प्रभाव कारणीभूत ठरू शकतात.अशा तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर, विशेषतः धूम्रपान हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असून, त्यांच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबरीने प्रजनन क्षमता आणि एकंदरीत आरोग्यास हानिकारक ठरते.
तंबाखु व्यसन व धुम्रपान बाबतची जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात राष्ट्रीय तंबाखु नियत्रंण कार्यक्रमाच्या अनुशंगाने विशेष पथक के.टी.एस.शासकीय सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहे. 20 फेब्रुवारी गोरेगाव तालुक्यातील गनखेरा येथे महिला मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पंचायत समिति सभापती चित्रकला चौधरी, माजी सभापती आरती चवारे, समाजसेविका सविता बेदरकर यांचेसह सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, दारूबंदी सदस्य यांचेसह गावातील महिला प्रामुख्याने उपस्थित होते.
ज़िल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय तंबाखु नियत्रंण कार्यक्रमातील जिल्हास्तरीय पथक त्यात जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर यांनी महिला मेळाव्यात उपस्थित राहुन तंबाखूच्या वापराचा स्त्रियांवर, विशेषतः गर्भवती स्त्रियांवर कसा परिणाम होतो याची माहीती दिली.
मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या महिलांची संख्या वाढत असताना त्यांच्यात तंबाखू सेवन करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त आहे. शेतीसारख्या शारीरिक श्रम असलेल्या कामात तसेच घर कामामध्ये उत्साह येण्यासाठी ग्रामीण स्त्रिया दंत, पेस्ट व मशेरी पावडरसारख्या पदार्थांनी दात घासतात. तसेच बिडी, हुक्का यांसारखे तंबाखूचे स्त्रोत असलेल्या पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे सांगितले. अशिक्षित, मोलमजुरी करणाऱ्या, शहरातील झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या आणि ग्रामीण भागातील बऱ्याच स्त्रियांमध्ये धूररहित तंबाखू उदा. मिश्री, तंबाखू अथवा तंबाखू असलेले पान चघळणे या प्रकारे तंबाखू वापरतात. स्वस्त असल्यामुळे कधी कधी जेवणाच्या एखाद्या वेळेस जेवण वगळून फक्त तंबाखूचे सेवन करतात. त्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्या बऱ्याच महिला अशक्त असतात व बरेचदा त्यांच्यात ऍनिमिया ही आढळतो. त्यामुळे आधीच आरोग्यासाठी हानीकारक असलेली तंबाखू स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणखी हानीकारक ठरते.
कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही स्वरुपातील तंबाखू (धूम्रपान अथवा धूररहित तंबाखू) मुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनमार्गाचे आजार, डायबिटीस या आजारांचा धोका संभवतो. या शिवाय क्षयरोग सारखे श्वसन मार्ग संसर्गजन्य आजारांचा सुद्धा त्रास होवु शकतो. या व्यतिरिक्त, स्त्रियांमध्ये गरोदरपणी तंबाखू सेवन केल्यास गरोदरपणात समस्या व गुंतागुंतीची प्रसुती होऊ शकते आणि होणाऱ्या बाळाला आणि आईला अधिक धोका ठरू शकतो. कमी वजन अपूऱ्या दिवसांचे बाळ अथवा कधी कधी बाळाच्या मृत्युचीही शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी सुद्धा तंबाखू सेवन अति जोखमीचे ठरत असते. कोणत्याही प्रकारचे तंबाकू सेवन-धूम्रपान अथवा धूररहित थांबवलेच पाहिजे आणि यासाठीच्या सरकारी मोफत सुविधा टोल फ्री न.1800112356 अथवा 011-22901701 वर मिस कॉल दिल्यास तंबाखू सुटण्यासाठी समुपदेशन केले जात असल्याचे सांगितले.



