गडचिरोलीविदर्भ

समता सप्ताहाचा समारोप; ९ ॲट्रॉसिटी पीडित वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रांचे वितरण

प्रशासनाकडून शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी ; गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव

गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘समता सप्ताहाचा’ मंगळवारी शानदार समारोप झाला. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या ९ कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला असून, प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शासन निर्णयानुसार, अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गतीने राबविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या ९ नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. आज समाज कल्याण विभाग सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते या वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

केवळ नियुक्तीपत्रांचे वितरणच नव्हे, तर समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात आणि ग्रंथालयात अभ्यास करून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. “विद्यार्थ्यांनी महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षणाद्वारे स्वतःची आणि समाजाची प्रगती करावी,” अशा शुभेच्छा मान्यवरांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले की, “अत्याचारग्रस्त कुटुंबीयांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करणे हा या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे.”

या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी कुलदीप मेश्राम यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीच पीडित कुटुंबांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने, समता आणि न्यायाच्या विचारांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button