भंडाराविदर्भ

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूलमध्ये आरोग्य शिबीर ; शिक्षक-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

नियमित तपासणी व योग्य जीवनशैलीचा संदेश

भंडारा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूल, सिव्हिल लाईन्स येथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एका आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच त्यांना असंसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

केटीएस रुग्णालयातर्फे आयोजित या शिबिराचे उद्घाटन एम.टी.एल. एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा उमादेवी आणि सचिव डॉ. नीरज कटकवार यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी डॉ. पंकज कटकवार उपस्थित होते. नियमित आरोग्य तपासणीमुळे असंसर्गजन्य आजारांपासून बचाव शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हर आणि एनसीडी कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या शिबिरात एकूण ११५ कर्मचाऱ्यांची बीपी आणि रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी बीपी व शुगरच्या नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले. भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीचे फायदे स्पष्ट केले.

या आरोग्य शिबिरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज राठोड, डिंपल राघोर्ते यांच्यासह प्रोग्रेसिव्ह शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button