नेलगुंडात अवघ्या २४ तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन

गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या विकासासह माओवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने गुरुवार, ३० जानेवारी रोजी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलिस स्टेशनची स्थापना केली.
सन 2024 या वर्षाअखेर 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागड पासून 20 किमी, धोडराज पासुन 14 किमी, पोमकें पेनगुंडा पासुन 04 कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.
सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 19 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 19 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 49 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 10, सोलापूरचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 113 बटा. डी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 06 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत.

पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलीस बल पोलीस उपमहानिरिक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडण्ट 113 बटा जसवीर सिंग, कमांडण्ट 09 बटा. शंभु कुमार, कमांडण्ट 37 बटा. दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते व पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.



