क्राईमनागपूरमुख्य बातमीविदर्भ

दोषारोपपत्र कमकुवत करण्यासाठी मागितली २ लाखांची लाच ; दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

नागपूर : नागपूरमध्ये एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र कमकुवत करून तक्रारदाराला फायदा मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीनंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदाराने नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांना मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश गोविंद राऊत (वय ५१) आणि पोलीस हवालदार चंद्रशेखर दामोदर घागरे (वय ५०) यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर, एसीबीच्या पथकाने २३ जून ते १४ जुलै २०२५ दरम्यान पडताळणी केली. या पडताळणीमध्ये दोन्ही पोलिसांनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, लाच देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारावर संशय आल्यामुळे त्यांनी ती रक्कम स्वीकारली नाही. यामुळे, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडण्यात अपयश आले.

मागणी केलेल्या लाचेचे पुरावे उपलब्ध असल्यामुळे दोन्ही पोलिसांवर सदर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, पोलीस निरीक्षक विवेक पडघान, मनापोशि कांचन गुलबासे, पोशि हरिष गांजरे, अमोल मेंगरे, प्रफुल बांगडे, विकेश राउत, चालक मपोशि प्रिया नेवारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button