क्राईमगडचिरोलीविदर्भ

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर मालकाचा गाडी जाळण्याचा प्रयत्न

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चामोर्शीतील गणपूर रै. रेतीघाटातून होणारी चोरी उघड

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तहसील कार्यालयाच्या हद्दीतील गणपूर रै. रेतीघाटातून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने जप्तीची धडक कारवाई केली. ६ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, यावेळी ट्रॅक्टर मालकाने कारवाई टाळण्यासाठी चक्क ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न करत बाचाबाची केल्याची घटना समोर आली आहे.

दिनेश देवेन मंडल (रा. चिंत्तरजनपूर) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (चालक: संजय वाघाडे, रा. गणपूर) हा अवैधरीत्या रेतीची वाहतूक करत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिकांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यात रेती आढळून आली. ट्रॅक्टर मालकाने गाडी अडवणाऱ्या नागरिकांशी बाचाबाची करून ट्रॅक्टर पुढे नेले. नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला.

नायब तहसीलदार एस. आर. कावळे यांच्या पथकाने त्वरित कारवाईसाठी धाव घेतली. ट्रॅक्टरमधून अज्ञात व्यक्ती रेती खाली करून जात असताना, पथकाने ट्रॅक्टर थांबवले. ट्रॅक्टरमध्ये ४ फावडे आणि ५ घमेले आढळून आले. कारवाई सुरू असताना ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर जाळण्याची धमकी देत महसूल पथकाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार कावळे आणि येणापूरचे मंडळ अधिकारी आतकरे यांनी कोणतीही पर्वा न करता पंचनामा पूर्ण केला.

अखेरीस, अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून तो तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. या कारवाईमुळे गणपूर परिसरातील रेती तस्कर धास्तावले आहेत. अवैध रेती वाहतूक थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी पोलिस पाटील एम. यू. झाडे, सुनील कोहपरे, महसूल सेवक मंगेश पेंदोर, व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button