गोंदियाविदर्भ

ग्रामीण भागातील खेळाडूंनी किक बॉक्सिंगमध्येही जिल्ह्याचे नावलौकीक करावे – निलेश शेलार

राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आमगाव येथे उद्घाटन

गोंदिया : ग्रामीण भागातील खेळाडूंनी किकबॉक्सिंगसारख्या आधुनिक खेळांमध्येही चमक दाखवून जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी केले.

तालुका क्रीडा संकुल, आमगाव येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन नायब तहसिलदार एस. जी. वेलादी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य सचिव धीरज वाघमारे, उपाध्यक्ष कृष्णा ढोबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी व तांत्रिक समितीचे सतीश राजहंस उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, राज्यस्तरीय स्पर्धा प्रामुख्याने जिल्ह्याच्या मुख्यालयात होत असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून आमगावमध्ये स्पर्धा आयोजित केली आहे. ‘अस्मिता खेलो इंडिया’मध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, खेळातील हार-जीत ही खेळाचा भाग असून उत्साह कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

नायब तहसिलदार वेलादी म्हणाले की, किकबॉक्सिंग ही स्पर्धा खेळताना पंचांचा निर्णय हे अंतिम मानावे. अपयश हीच पुढील यशाची पायरी असून प्रत्येक संघाने क्रीडाभाव जपावा.

जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले यांनी प्रास्ताविकातून माहिती देत सांगितले की, 4 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित या स्पर्धेत अमरावती, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर, नाशिक व मुंबई अशा आठ विभागांतील 500 शालेय खेळाडू सहभागी झाले आहेत. व्यवस्थापक, पंच व सामनाधिकारी असे एकूण 50 अधिकारी स्पर्धेचे संचालन करत आहेत. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात क्रीडा संस्कृतीला चालना मिळून विद्यार्थ्यांना नोकरी क्षेत्रात 5 टक्के सवलतीचा लाभही मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी दाद दिली. स्पर्धेपूर्वी सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास गोंदिया जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत चावके, सचिव तेजसिंग आलोत, प्रशासकीय अधिकारी अस्मिता सुर्यवंशी, विविध शाळांचे प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कुलदीप लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंतकुमार चावके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button