
हजारो विद्यार्थी व युवकांचा व्यसनमुक्तीचा निर्धार
गडचिरोली : सन २०२५ ला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता ‘शुद्धीत’ राहून जल्लोष करावा, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तीपथ’, पोलीस प्रशासन आणि शिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रॅली, पथनाट्य, मॅराथॉन आणि संकल्प पत्राद्वारे हजारो नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी दारूमुक्त नववर्षाची शपथ घेतली.
देसाईगंज येथे मुक्तीपथ आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ४५६ युवक-युवतींनी आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा संकल्प केला. यावेळी आयोजित मिनी मॅरेथॉन आणि रॅलीने शहराचे लक्ष वेधले. तालुका संघटक लेखाराम हुलके आणि हेमंत मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. एटापल्ली येथील जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी १०२८ विद्यार्थ्यांनी जिल्हा दारूबंदी आणि बाल संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. तसेच कसनसूर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनीही रॅली काढून जनजागृती केली. भामरागडमध्ये नगरपंचायत, पोलीस स्टेशन आणि विविध शाळांच्या सहभागातून त्रिवेणी संगम येथे सेल्फी पॉईंट आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्याधिकारी अभिजित सोनवणे आणि पोलीस निरीक्षक सचिन सेवाडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
सिरोंचा येथे विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी बस स्टँड चौकात पथनाट्य सादर करून ३१ डिसेंबरला दारू न पिण्याचे आवाहन केले. या रॅलीत एसडीपीओ (SDPO), तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) स्वतः सहभागी झाले होते. चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन आणि मुक्तीपथच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल ते पोलीस स्टेशन अशी रॅली काढण्यात आली. तसेच चामोर्शी शहरातही २४५ विद्यार्थी आणि युवतींनी संकल्प पत्र भरून दारूबंदीचा आवाज बुलंद केला.

आरमोरी शहरात विद्यानगर एम.जी. कॉलेज व इतर शाळांनी रॅली काढून ‘मी दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही’ अशी शपथ घेतली. कोरचीमध्ये पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मेन बस स्टॉप चौकात कार्यक्रम झाला. अहेरीत आलापल्ली येथील सावित्रीबाई फुले व धर्मराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला.
कुरखेडा, धानोरा आणि मूलचेरा येथेही आयटीआय, पोलीस विभाग आणि मुक्तीपथच्या वतीने रॅली काढून नागरिकांना दारूच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली होणाऱ्या हुल्लडबाजीला आणि व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



