भंडाराविदर्भ

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ; 77 उमेदवारांची प्राथमिक निवड

भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा व ओयासिस इंटरनॅशनल स्कूल बेला, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने 04 मार्च रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत इंटरनॅशनल स्कूल बेला, भंडारा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला.

सदर रोजगार मेळाव्यात 6 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण 460 जागेकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण 255 उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामध्ये 74 उमेदवारांनी प्रत्यक्ष, 34 उमेदवारांनी गुगल फॉर्मदवारे आणि विविध महामंडळाना भेटी दिलेल्या 147 उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. त्यामधून 108 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी 77 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे.

सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके तर प्रमूख मार्गदर्शक म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र सोनटक्के हे उपस्थित होते. तसेच ओयासिस इंटरनॅशनल स्कूलचे प्राध्यापक खांडेकर, ग्लोब कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक अमोल वैरागडे, पंकज भूते, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे, राजेश नायक, प्रितम, अभ्यंकर बोरकर, अतूल हरंगडे, अनिल हेडाऊ, महेंद्र कापगते, अनिता बन्सोड, मन्सारामजी पडोळे आदी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयामार्फत रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देत असल्याचे सांगीतले. उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमेदवारांनी सुरूवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत, याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर, प्रमूख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. देवेंद्र सोनटक्के यांनी उमेदवारांनी जिवनात ध्येय निश्चीत करून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जिवनातील अनूभवही उमेदवारांना सांगीतला. व्यासपीठावर उपस्थित विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कंपनीमधील कामाचे स्वरूप, वेतन व भत्ते, इतर सुविधा इ.बाबतीत थोडक्यात उमेदवारांना माहिती दिली.

या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. भंडारा यांचेकडून तुषार रेहेपाडे, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. भंडारा यांचकडून सोनल तांडेकर, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या.भंडारा यांचेकडून संजय बावणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. भंडारा यांचकडून श्रीकांत भोंडेकर हे उपस्थित होते. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण 147 उमेदवारांनी उपस्थित विविध महामंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन महामंडळाकडील विविध स्वयंरोजगार विषयक योजनांची माहिती घेतली.

सदर रोजगार मेळाव्यात जिल्हयातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. भंडारा यांचकडून जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे हे उपस्थित होते. एकूण 42 उमेदवारांनी सदर महामंडळाला भेटी देऊन स्वयंरोजगार विषयक योजनांची माहिती घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून आभार वरिष्ठ लिपीक शफीउल्ला करीम सय्यद यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहायक आयुक्त सुधाकर झळके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपीक आशालता वालदे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, वरिष्ठ लिपीक प्रिया माकोडे, शिपाई आय.जी. माटूरकर, राज पारधी, जिल्हा समन्वयक अतूल पडोळे, जिल्हा समन्वयक नाजमा पठाण तसेच ओयासिस इंटरनॅशनल स्कूल बेला, भंडारा येथील संस्थेचे प्राचार्य तथा संस्थापक प्रशांत टेंभूर्णीकर, प्राध्यापक खांडेकर तसेच इतर कर्मचारी वृंद आदींनी अथक परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button