नागपूरमुख्य बातमीविदर्भ

पोलिसांनीच केले व्यापाऱ्याचे अपहरण!

मोबाईल, व्हॉलेट हिसकावत केली १५ लाखांच्या खंडणीची मागणी    

नागपूर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना नागपुरात घडली आहे. दोन पोलिसांनीच नवी मुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण करत १५ लाखांची खंडणी मागितली. व्यापाऱ्याला सहा तास गाडीत ओलीस ठेवले. अखेर पोलिस पथकानेच व्यापाऱ्याची नरेंद्रनगर उड्डाणपुलाजवळ सुटका केली.

गौरव पुरुषोत्तम पराळे (रघुजीनगर क्वार्टर्स), राजेश उत्तमराव हिवराळे (सीताबर्डी क्वार्टर्स), आकाश राजू ग्वालबंसी (संजय गांधीनगर) व विक्रांत, अशी आरोपींची नावे आहेत. यातील गौरव व राजेश हे बजाजनगर पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार आहेत. मुंबईतील व्यापारी व आयबिल्ड फिनकॉर्प ट्रेड या कंपनीचे मालक अजय वाघमारे (३७, रा. खारघर), असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे.

वाघमारे यांनी २९ सप्टेंबर रोजी क्विन्स सेलिब्रेशन हॉल येथे ग्राहकांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यासाठी ते दुपारी एक वाजता सहकाऱ्यांसोबत कारने तेथे पोहोचले. त्यांच्या मागे एक कार उभी होती व त्यातून पोलिस गणवेश घातलेला गौरव आला. साहेब बोलवत आहेत, असे म्हणून तो त्यांना कारमध्ये घेऊन गेला. दोन्ही पोलिसांनी वाघमारे यांचे तीन मोबाइल व व्हॅलेट काढून घेतले. तुमच्याविरोधात २० कोटींच्या घोटाळ्याची तक्रार असून, कारवाई टाळण्यासाठी १५ लाख रुपये लागतील, असे आरोपीने त्यांना सांगितले.

पोलिसांच्या भीतीने त्यांनी २ लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. परंतु आरोपी १५ लाख रुपयेच लागतील, असे म्हणाले. वाघमारे यांनी त्यांचे सहकारी दिलीप शिंदे यांना फोन करून पैशांची जुळवाजुळव करण्यास सांगितले. आरोपी पोलिसदेखील शिंदे यांच्याशी बोलले. शिंदे यांनी नागपुरातील सहकाऱ्याला या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी साडेसात वाजता नरेंद्रनगर पुलाजवळ गाडी अडविली व वाघमारे यांची सुटका केली.

आरोपींनी वाघमारे यांना पैसे देण्यासाठी विविध धमक्या दिल्या. वाघमारे यांनी पोलिस ठाण्यात गाडी का नेत नाहीत, अशी विचारणादेखील केली. दुपारी दीड ते साडेसात या कालावधीत आरोपींनी त्यांना नागपुरातच गाडीत ठेवले व गाडी जात होती. पोलिसांनी वाघमारे यांच्या ‘मोबाइल लोकेशन’च्या आधारे गाडीचा शोध घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button