संपत्तीच्या वादातून ‘त्या’ पती-पत्नीची हत्या ; पतीचाही मृतदेह आढळला

करपनफुंडी येथील हत्या प्रकरण ; पाच जण पोलिसांच्या ताब्यात
गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावर शेतातील झोपडीत वास्तव्य करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह बांडे नदीत मंगळवारी आढळला होता, तर महिलेचा पती बेपत्ता होता. बेपत्ता पतीचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच बुधवारी आढळला. सुरुवातीला जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाल्याचा पोलिसांनी अंदाज लावला होता; परंतु सखोल चौकशी सुरू असतानाच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
एटापल्ली तालुक्याच्या करपनफुंडी गावातील बुर्गो रैनू गोटा (५५) या महिलेचा मृतदेह मंगळवारी बांडे नदीपात्रात आढळला होता, तर तिचा पती रैनू जंगली गोटा (६०) हा बेपत्ता होता. करपनफुंडी गावापासून ५ किमी अंतरावरील जांभिया व बांडे नदीच्या संगम किनारी असलेल्या शेतातील झोपडीत हे दाम्पत्य वास्तव्य करीत होते. शनिवारपासून (दि. २४) ते दोघेही बेपत्ता होते. कुटुंबीय त्यांचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता नदी संगम परिसरात कुजलेल्या स्थितीत बुर्गो गोटा हिचा मृतदेह आढळून आला. मात्र, पती रैनू गोटा हा बेपत्ता होता. बुधवारी त्याचा मृतदेह घटनास्थळापासून ८ किमी अंतरावर नदीपात्रातच आढळला.
पोलिसांना सुरुवातीला जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या झाली असावी, असा संशय होता; परंतु तपासाची चक्रे फिरवताच काही नातेवाइकांवर संशय आला. त्यानंतर पाच नातेवाईकांना ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचे समोर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सखोल तपास बुर्गी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ पुरी करीत आहेत.



