गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे अपघाती निधन

मध्यरात्री भरधाव कारने दिली धडक ; आमदाराच्या पुत्राचे वाहन असल्याची चर्चा

गडचिरोली : ‘आधार विश्व फाऊंडेशन’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांच्या कारला मध्यरात्री नागपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. गडचिरोलीकडे येत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या एका कारने जोरदार धडक दिल्याने, या अपघातात गीता हिंगे यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

रात्री १२.३० च्या सुमारास नागपूर सोडल्यानंतर पाचगाव पोलीस चौकीच्या हद्दीत हा अपघात झाला. गीता हिंगे आणि त्यांचे पती सुशील हिंगे नागपूर येथील मुलांना भेटून गडचिरोलीकडे येत असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या एका महागड्या कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, धडक देणारे वाहन रस्ता दुभाजक तोडून हिंगे यांच्या वाहनावर आदळले. या अपघातात गीता हिंगे गंभीर जखमी झाल्या. पती सुशील हिंगे आणि चालकाला किरकोळ मार लागला. त्यांना तातडीने नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान गीता हिंगे यांचे निधन झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणारे वाहन एका आमदाराच्या पुत्राचे असल्याची चर्चा आहे.

उच्चशिक्षित असलेल्या गीता हिंगे यांनी प्राध्यापकी केल्यानंतर ‘आधार विश्व फाउंडेशन’द्वारे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. कोरोनाकाळात त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना डबे पोहोचवण्यापासून ते निराधारांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. नुकताच त्यांनी माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला होता आणि पक्षाने त्यांना महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विराजमान केले होते. राजकीय कारकिर्दीच्या अत्युच्च टप्प्यावर असतानाच काळाने त्यांना हिरावून नेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button