
गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयात भारतीय सेनेचा सेना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, प्रमुख सत्कार मूर्ती म्हणून भारतीय सेनेत सेवा देणारे सेवानिवृत्त सैनिक ऋषी वंजारी व हरिप्रसाद ध्यानी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने सैनिकी निदेशक ऋषी वंजारी व हरिप्रसाद ध्यानी यांना सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमात मान्यवरांमार्फत भारतीय सेनेच्या शौर्यगाथा, बलिदान आणि देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली. तसेच भारतीय सेनेतील जवानांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रा ढोले म्हणाले लेफ्टनंट जनरल कोडंदेरा एम. करिअप्पा जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल भारताचा सेना दिवस किंवा लष्कर दिवस हा दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत तसेच सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर लष्करी कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शिस्त, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारावी, असे आवाहन केले. देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सेनेचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. सैनिकी निदेशक ऋषी वंजारी व हरिप्रसाद ध्यानी यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनुभवलेले थरारक सैनिकी जीवन या बद्दल सविस्तर कथन केले. यावेळी उपस्थित माण्यावार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग १०वीतील कॅडेट मास्टर अंशुमन सहारे याने केले तर आभार हार्दिक दुर्गम याने मानले.



