क्राईमचंद्रपूरविदर्भ

१४० रुपयांची लाच घेताना मुद्रांक विक्रेत्याला अटक

चंद्रपूर एसीबीची धडक कारवाई   

चंद्रपूर : शासकीय कामासाठी लागणाऱ्या मुद्रांक (स्टॅम्प) पेपरवर शासकीय शुल्कापेक्षा अतिरिक्त १४० रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुद्रांक विक्रेता आणि त्याच्या मदतनीसला रंगेहात अटक केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील जलनगर वॉर्डातील मुद्रांक विक्रेता मनीष अरुण देशमुख व मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार यांना वीज टेंडरच्या कामासाठी ५०० रुपयांचे तीन स्टॅम्प पेपर आणि १०० रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर हवे होते. या स्टॅम्प पेपरची शासकीय किंमत २ हजार रुपये होती. मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रत्येकी ३० रुपये असे एकूण ९० रुपये आणि १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रत्येकी १० रुपये असे एकूण ५० रुपये, म्हणजेच शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त १४० रुपयांची मागणी केली. अतिरिक्त १४० रुपये न दिल्यास स्टॅम्प पेपर मिळणार नाही, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली होती.

तक्रारदाराला अतिरिक्त पैसे (लाच) देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला असता, ३१ ऑक्टोबर रोजी मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी १४० रुपयांची लाच स्वीकारली आणि ती मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांच्याकडे देत असताना लाचलुचपत विभागाने दोघांनाही रंगेहात अटक केली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस कर्मचारी अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१५ मध्ये ५०० रुपयांच्या जास्त मूल्याचे छापील मुद्रांकचा वापर बंद केला होता, आता मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ई चालान सुरु करण्यात आले आहे. पूर्वी जास्त मूल्याच्या मुद्रांक पेपर्स विकल्याने विक्रेत्यांना चांगला फायदा व्हायचा मात्र शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पन्नात तोटा व्हायला लागला त्यामुळे चंद्रपुरात बहुतांश मुद्रांक विक्रेते १० रुपये अतिरिक्त शुल्क घेतात. आता या कारवाईमुळे सध्यातरी मुद्रांक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष बाब म्हणजे मुद्रांक विक्रेत्याला ५०० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर्स ची विक्री केली तर त्यांना ३ टक्के कमिशन शासनाद्वारे मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button