
कोटगल येथील घटना, पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
गडचिरोली : दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण करून घराला आग लावल्याची धक्कादायक घटना ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास शहराजवळील कोटगल येथे घडली. या आगीत घरात असलेले १३ हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला दशरथ भुरसे (वय २८, रा. कोटगल) यांचा दशरथ भुरसे याच्यासोबत २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र, पती दारू पिऊन त्रास देत असल्याने डिसेंबर २०२४ पासून मंगला मुलासह माहेरी वांगेपल्ली (ता. अहेरी) येथे राहत होती.
जवळपास दहा दिवसांपूर्वी दशरथने मंगलाची माफी मागितली, त्यामुळे पती-पत्नी पुन्हा कोटगलमधील घरी राहू लागले. परंतु, ८ जून रोजी दशरथ हा दारू पिऊन घरी आला. त्याने “तू काहीच काम करत नाहीस,” असे म्हणत पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. मंगला मुलासह घराबाहेर निघू लागली असता, दशरथने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि घरातील दोन बाजांना आग लावली. या आगीत घरात असलेले धान्य, शिलाई मशीन, कपडे आणि इतर संसारोपयोगी साहित्य असे एकूण १३ हजार रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले. सुदैवाने दशरथ सुखरूप आहे.
मंगला हिने घरातून धुराचे लोळ बाहेर येताना पाहताच तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. त्यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मंगलाच्या फिर्यादीवरून दशरथ भुरसे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संजय पोल्लेलवार करत आहेत.



