
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात अग्रेसर असलेल्या सावली शाळेने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे – सुरेश हर्षे
गोंदिया : उन्हाळ्याची सुट्टी संपून २३ जून रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी आवडते शिक्षक व सवंगडी यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने बाल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हा परिषद गोंदियाने सर्व मुख्याध्यापकांना ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी सावली शाळेला भेट देऊन तेथील मनमोहक परिसर आणि आनंददायी शिक्षणपूरक वातावरणाचे भरभरून कौतुक केले, तसेच येणाऱ्या काळात सावली शाळेने संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा परिषद अध्यक्ष लाईकराम भेंडारकर यांच्या नेतृत्वात, तसेच शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. नागपूर विभागात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात दुसरा क्रमांक पटकावलेल्या देवरी तालुक्यातील प्रख्यात व नावाजलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा, सावली येथे शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, सुमधुर गीतांच्या निनादात स्वागत केले. शाळेचा आकर्षक परिसर, एखाद्या रिसॉर्टमध्ये बघावा असे वातावरण, सुंदर रंगरंगोटी, फुग्यांनी व रांगोळीने केलेली सजावट यामुळे नवीन दाखल विद्यार्थ्यांचे मन आकर्षित करत होती.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या हस्ते कॉन्व्हेंट आणि पहिलीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद सावली शाळेची सुंदरता खरोखरच मन वेधून घेणारी असल्याचे सांगितले. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी लोकसभागातून व सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेचा कायापालट केल्याचे कौतुक केले आणि येणाऱ्या दिवसात सावली शाळा संपूर्ण महाराष्ट्रात उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी गावाचे आणि शाळेतील सहकारी शिक्षकांचेही भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाला कैलाश कारंजेकर (उपविभागीय अभियंता), केंद्रप्रमुख डी. टी. लाडे, रोहित पटले (कनिष्ठ अभियंता), मारोती नागरगोजे (कनिष्ठ अभियंता), डॉ. उमाटे, सरपंच झुलन पंधरे, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर यदुवंशी, उपाध्यक्ष चित्रलेखा इठोले, माता पालक संघ अध्यक्ष डूडेश्वर गहाणे यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सोबतच गावातून शोभायात्रा काढण्यात आली आणि गोड जेवण देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संदीप तिडके, पदवीधर विषय शिक्षिका वर्षा वालदे, सहाय्यक शिक्षक वसंत नाईक, जोहनलाल मलगाम, शीतल खाडे, वैशाली बडे, वैशाली सोनवाने, विद्या बिंझलेकर, मायाताई उईके, अरुणा मेश्राम यांसह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



