गडचिरोलीविदर्भ

डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्याकडून पुत्रांकडे नेतृत्वाची धुरा ; डॉ. आनंद आणि अमृत बंग यांनी स्वीकारली सूत्रे

दोन दशकांच्या आरोग्य सेवेचा वारसा आता युवा पिढीच्या हाती ; डॉ. अभय बंग संस्थापक ट्रस्टी व अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार

गडचिरोली : गडचिरोलीच्या मातीतून जागतिक आरोग्य नकाशावर आपला ठसा उमटविणाऱ्या ‘सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च’ (सर्च) या संस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर दैनंदिन जबाबदारीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ‘सर्च’च्या संचालकपदी त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. आनंद बंग, तर ‘निर्माण’ उपक्रमाच्या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी ‘सर्च’च्या मुख्यालयात आयोजित एका भावपूर्ण कार्यक्रमात दोन्ही नूतन संचालकांनी आपल्या पदांची सूत्रे स्वीकारली.

१९८६ मध्ये स्थापन झालेल्या ‘सर्च’चा प्रवास आठवताना डॉ. अभय बंग भावूक झाले. ते म्हणाले, “आम्ही सेवा आणि संशोधनातून देशाच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘सर्च’ची स्थापना केली होती. आता नव्या नेतृत्वाने भूतकाळाचे ओझे न बाळगता काळाची पावले ओळखून कार्यक्रमात बदल करावेत. विज्ञानाचा वापर, आरोग्य आणि युवकांसाठी सत्याचा शोध आणि गांधीवादी मूल्ये ही त्रिसूत्री कायम मार्गदर्शक ठरेल.”

डॉ. राणी बंग यांनी संस्थेतील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आपल्या संघटनेत कोणी मोठा किंवा छोटा नाही, हीच आपली खरी ताकद आहे. सर्वांचे ऐकून घ्या, पण कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास सोडू नका,” असा कानमंत्र त्यांनी नूतन संचालकांना दिला. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग हे यापुढेही मार्गदर्शक आणि संस्थापक ट्रस्टी म्हणून कार्यरत राहतील.

डॉ. आनंद बंग (संचालक, ‘सर्च’): “माझ्या मनात आज कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव आहे. ‘सर्च’च्या मूल्यांशी प्रतारणा न करता ही नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” अमृत बंग (संचालक, ‘निर्माण’): “‘सर्च’चा वारसा अत्यंत मौल्यवान आहे. आपण जे काही करू ते देशातील सर्वोत्तम असले पाहिजे. नवनिर्मिती आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

डॉ. बंग दाम्पत्याने निर्माण केलेल्या या सेवायज्ञाची समिधा आता युवा पिढीच्या हाती गेल्याने, आगामी काळात ‘सर्च’च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील संशोधनाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एक दृष्टीक्षेप: ‘सर्च’चा गौरवशाली प्रवास

स्थापना: १९८६ (डॉ. अभय व डॉ. राणी बंग). कार्यक्षेत्र: गडचिरोली जिल्हा (विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण आरोग्य). प्रमुख योगदान: बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ‘गृह आधारित नवजात अर्भक शुश्रूषा’ मॉडेल, ज्याचा स्वीकार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केला. पुरस्कार: पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांसह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button