गडचिरोलीविदर्भ

‘पीएलजीए सप्ताहा’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

गडचिरोली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यामध्ये १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश ०७ डिसेंबर च्या मध्यरात्रीपासून ते २१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

माओवाद्यांकडून ‘पीएलजीए सप्ताहा’दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक व गंभीर घटना घडवण्याची शक्यता आहे. तसेच, याच कालावधीत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून मोर्चे व आंदोलने होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत लागू असलेल्या या आदेशानुसार, शस्त्रे, स्फोटक पदार्थ किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे. कोणतेही दाहक किंवा उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दर्शवणारे आवेशपूर्ण भाषण, घोषणा, चित्रे किंवा चिन्हे यांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे. उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक काढण्यास मनाई असून, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी पंडा यांनी जारी केलेले हे सर्व प्रतिबंध संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button