
अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी ; सुविधा आणि व्हेंटिलेशनवर विशेष लक्ष
गडचिरोली : जिल्हा क्रीडा संकुलाची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत. त्यांनी सोमवारी (२ जून) जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला, तसेच संकुलात सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा, इनडोअर बॅडमिंटन हॉल, स्विमिंग टँक आणि डोम टाईप मल्टीगेम इनडोअर हॉल यासारख्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची माहिती घेतली. त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित केले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संकुल समितीने कामाची गुणवत्ता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी, इनडोअर बॅडमिंटन हॉलमधील व्हेंटिलेशन (वायुवीजन) तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेली सर्व कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



