
गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयामध्ये गुरुवारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, प्रा. संदीप कोटांगले, प्रा. गजानन ढोले, ज्येष्ठ शिक्षक भूपेंद्र चौधरी, शाहिद शेख, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी आणि हरिप्रसाद ध्यानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, साईबाबा आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाली.
याप्रसंगी प्रा. संदीप कोटांगले, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, भूपेंद्र चौधरी आणि शाहिद शेख यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील हेतू आणि त्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी गुरुंचे महत्त्व सांगताना अनेक उदाहरणे दिली. भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण स्थान आहे, हे “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः” या श्लोकातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. गुरु केवळ शिक्षक नसून, ते आपल्या जीवनाचा मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतात. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेतात, असे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी आपले मत मांडताना सांगितले की, “गुरु हे फक्त मानवच असतात असे नाही, तर एखादी निर्जीव वस्तूदेखील एखाद्याचे गुरु असू शकते.” ज्यापासून आपल्याला काही शिकायला मिळते, असे सर्वच आपले गुरु असतात, असे त्यांनी नमूद केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयातील कॅडेट्स मास्टर अर्णव रॉय, नयन पेंदाम, गुणवंत शेंडे, विपुल मुंगळे, अंश धोटे, अनुष गजभिये, हार्दिक, आर्यन निब्रड आणि वेदांत चाफले आदींनी गुरुपौर्णिमेबद्दल भाषणे दिली. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक रहीम पटेल यांनी केले, तर आभार संतोष कुळमेथे यांनी मानले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



